मनाठा ते तामसा-तळेगाव मार्गावरील रस्त्याच अक्षरशः चाळणी; श्रावण महिन्यात हजारो भाविकांना नाहक त्रास....
’
संतोष डवरे, हादगाव :तालुक्यातील प्रसिद्ध हेमाडपंथी महादेव मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केदारगुडा येथील केदारनाथ महादेवाच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यात हजारो भाविकांची गर्दी होत असताना, मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था भाविकांच्या श्रद्धेच्या मार्गात अडथळा ठरत आहे. मनाठा मार्गे येणारा सुमारे दोन किलोमीटर तसेच तामसा-तळेगाव मार्गे येणारा सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता अक्षरशः खड्डेमय झाल्याने भाविकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.विशेष म्हणजे, याच मार्गावरील बहुतांश रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चांगल्या स्थितीत करण्यात आला असताना केवळ दोन ते चार किलोमीटरचा रस्ता दुरुस्तीपासून वंचित का ठेवण्यात आला, असा संतप्त सवाल भाविकांकडून उपस्थित केला जात आहे. या थोड्याशा अंतरासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधीची कमतरता आहे का? की या रस्त्याच्या कामासाठी प्रशासकीय पातळीवरच उदासीनता आहे, असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत. मनाठा ते तामसा मार्गे तळेगाव पाटीपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्त्याचे बांधकाम तसेच पुलाचे काम काही दिवसांपूर्वी पूर्ण करण्यात आले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत होऊन केदारगुडा येथील महादेव मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.मात्र, प्रत्यक्षात या मार्गावरील केवळ दोन ते तीन किलोमीटरचा महत्त्वाचा भाग अद्याप पूर्ण करण्यात आलेला नाही. त्यामुळे चांगला रस्ता संपल्यानंतर अचानक खड्ड्यांचा आणि दगडधोंड्यांचा सामना भाविकांना करावा लागत आहे. परिणामी, संपूर्ण रस्ता व्यवस्थित असूनही केवळ काही किलोमीटरच्या दुरवस्थेमुळे भाविकांचा हिरमोड होत आहे.‘प्रशासकीय काम, पण बारा महिने थांब….!’ अशी उपरोधिक चर्चा सध्या परिसरात रंगली असून, संबंधित विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे.श्रावणात भाविकांची मोठी गर्दी केदारगुडा येथील हेमाडपंथी महादेव मंदिराला परिसरातील भाविकांमध्ये विशेष धार्मिक महत्त्व आहे. श्रावण महिन्यात विविध गावांतून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येथे येतात. अनेक भाविक खासगी वाहने, दुचाकी, चारचाकी तसेच विविध वाहनांतून मंदिराकडे जातात.मात्र, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहन सांभाळताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने खड्ड्यांची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून, विशेषतः दुचाकीस्वार आणि ज्येष्ठ भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.केदारनाथ मंदिराकडे जाणारा हा मार्ग केवळ स्थानिक नागरिकांच्या दळणवळणाचा मार्ग नसून, धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. त्यामुळे संबंधित विभागाने केवळ कागदी कारवाई न करता प्रत्यक्ष पाहणी करून उर्वरित रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी भाविक व परिसरातील नागरिकांकडून होत आहे.श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी लक्षात घेता किमान खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीस योग्य करावा आणि त्यानंतर कायमस्वरूपी रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मान्यवर लोकप्रतिनिधींनी वैयक्तिक लक्ष द्यावे….
या भागाचे माजी खासदार सुभाषराव वानखेडे, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, विद्यमान खासदार नागेश पाटील आष्टीकर,तसेच विद्यमान आमदार बाबुराव कदम कोहळीकर हे केदारनाथ येथील महादेवावर श्रद्धा ठेवणारे लोकप्रतिनिधी म्हणून परिचित आहेत. या मार्गावर त्यांचा नेहमीच प्रवास होत असल्याने रस्त्याची सद्यस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देऊन त्यांनी या प्रश्नात वैयक्तिक लक्ष घालावे. हजारो भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून केदारगुडा देवस्थानाकडे जाणारा रस्ता सुकर करून द्यावा, अशी मागणी आता परिसरातील भाविक भक्तांमधून जोर धरू लागली आहे.
