हिमायतनगर | प्रतिनिधी विकास गाडेकर.हिमायतनगर तालुक्यातील मौजे मंगरूळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप करत तातडीने दोन शिक्षकांची नेमणूक करण्याची मागणी उपसरपंच संतोष आंबेकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा परिषद नांदेडच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांना भेटून निवेदन सादर केले.मंगरूळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण दिले जाते. शाळेतील एकूण विद्यार्थी संख्या सुमारे १२५ असून, सध्या केवळ ४ शिक्षक कार्यरत आहेत. सात वर्गांसाठी फक्त चार शिक्षक असल्याने सर्व वर्गांना पुरेसा वेळ देणे अशक्य होत असून विद्यार्थ्यांना अपेक्षित दर्जाचे शिक्षण मिळत नसल्याचे चित्र आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे.शिक्षकांच्या कमतरतेमुळे पालकांमध्येही तीव्र नाराजी असून काही पालक मुलांना शाळेत न पाठवता शेतात कामासाठी नेत असल्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे शाळागळतीचे प्रमाण वाढत असून भविष्यात साक्षरतेच्या प्रमाणावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे मत उपसरपंच संतोष आंबेकर यांनी व्यक्त केले.या प्रकरणाकडे शिक्षण विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने त्वरित दखल घेऊन मंगरूळ शाळेत दोन शिक्षकांची नेमणूक करावी, अन्यथा संविधानिक मार्गाने पुढील भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा मंगरूळचे उपसरपंच तथा उप-जिल्हाध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी (अनुसूचित जाती विभाग) संतोष आंबेकर यांनी दिला आहे.
