हिमायतनगर(प्रतिनिधी): विकास गाडेकर
समाजातील न्याय, समता, बंधुता आणि प्रबोधन या मूल्यांच्या प्रसारासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना दिला जाणारा प्रतिष्ठेचा “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” यावर्षी हिमायतनगर तालुक्यातील मौजे मंगरूळ येथील तरुण व तडफदार लोकप्रतिनिधी, मा. उपसरपंच संतोष आंबेकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, स्वातंत्र्य व बंधुता या महान तत्त्वांशी एकनिष्ठ राहून समाजात अमूलाग्र परिवर्तन घडविण्याच्या प्रक्रियेत संतोष आंबेकर यांचे योगदान उल्लेखनीय व प्रेरणादायी असल्याने दैनिक वीर शिरोमणी व नंदगिरीचा कानोसा यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याची माहिती मुख्य संपादक शंकरसिंह ठाकूर व मारोती शिकारे यांनी दिली.
या पुरस्काराची घोषणा होताच हिमायतनगर तालुक्यासह नांदेड जिल्हाभरातून संतोष आंबेकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सामाजिक क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार आपल्या छोट्याशा गावातील तरुणाला मिळणे ही मंगरूळ ग्रामस्थांसाठी अभिमानाची बाब असल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.
सदर पुरस्कार वितरण सोहळा दिनांक १८ मे २०२६ रोजी नांदेड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
